औरंगाबादेत या भाजप नेत्यावर पत्रकांराचा रोष का…?

पत्रकारांना जांभेकरांचे वंशज संबोधल्यामुळे पत्रकार भडकले पत्रकांराचा रोष पाहून या भाजप नेत्याने दिलगिरी केली व्यक्त…!

औरंगाबाद प्रतिनिधी :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत पत्रकारांना जांभेकरांचे वंशज संबोधल्यामुळे पत्रकार चांगलेच भडकले त्यामुळे भडकलेल्या पत्रकांराचा रोष पाहून चंद्रकांत पाटलांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. यापूर्वी नागपुरातील पत्रकार परिषदेतही चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांना आरे-तुरेची भाषा वापरल्यामुळे त्यांना पत्रकारांची माफी मागून पत्रकार परिषदेतून काढता पाय घ्यावा लागला होता.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून भाजपकडून प्रवीण घुगे हे इच्छूक होते. परंतु घुगे हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना डावलून बोराळकरांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा खुद्द भाजप कार्यकर्त्यांमध्ये असल्याच्या मुद्याकडे पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले असता चंद्रकांत पाटलांनी तुम्ही जांभेकरांचे वंशज आहात, विडंबन करू नका, जशी आहे, तशी बातमी द्या, असे पत्रकारांनाच सुनावण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत पाटलांनी आपल्याला जांभेकरांचे वंशज संबोधल्याची बाब पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या पत्रकारांना खटकली आणि पत्रकार चंद्रकांत पाटलांवर भडकले. त्यांनी आमचा आणि जांभेकरांचा संबंध काय? आम्ही त्यांचे वंशज कसे काय?, असे म्हणत चंद्रकांत पाटलांना धारेवर धरले.

पत्रकारांचा रोष पाहून चंद्रकांत पाटलांनी मग सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. माझे म्हणणे एवढेच आहे की, बातमी जशी आहे तशी छापणे हे पत्रकारांचे काम आहे. पण थोडेसे विडंबन होतेय. गैरसमज नसावा, तुम्ही जांभेकरांचे वंशज म्हणजे तुम्ही फिजिकल वंशज आहात, असे मला म्हणायचे नाही, असे सांगत चंद्रकांत पाटलांनी सारवासारव केली. तो मुद्दा आता सोडून द्या, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी दुसऱ्या मुद्याकडे आपला मोर्चा वळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *