ओझरला आढळला दुर्मिळ ‘अल्बीनो ‘ तस्कर जातीचा साप….!

ओझर ता.निफाड प्रतिनिधी :-   येथील सिताई नगर,साईधाम परिसरात  दुर्मिळ समजला जाणारा ‘अल्बीनो’ प्रकारातील तस्कर जातीचा जवळपास दिड फूट लांबीचा बिनविषारी साप आढळून आला आहे.

या बद्दल अधिक माहिती अशी की ,येथील सिताई नगर,साईधाम येथे राहणारे नाभिक व्यावसायिक संतोष वाघ यांनी घराजवळ ठेवलेल्या विटांच्या ढिगाऱ्यात साप जाताना बघितला व त्यांनी ताबडतोब सर्परक्षक संदीप कराटे यांना फोन केला असता ,सर्परक्षक कराटे तात्काळ घटनास्थळी पोहचले व विटांच्या ढिगाऱ्याखाली लपलेल्या सापाला पकडले , पकडलेला साप तर त्यांनी ओळखला पण सापाचा रंग नेहमी दिसतो त्या पेक्षा वेगळा दिसल्याने त्यांनी सर्पअभ्यासक सुशांत रणशूर यांना या बाबत फोन वरून कल्पना देत व्हाट्सएपच्या माध्यमातून फोटो पाठवले असता त्यांनी हा साप दुर्मिळ प्रकारातील अल्बीनो असून तस्कर जातीचा साप असल्याची पुष्टी दिली. या अल्बीनो सापाला चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आले असून सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर भैरव वनपरीमंडळ अधिकारी देविदास चौधरी , वनरक्षक व्ही .आर. टेकणार ,वाल्मिक वर्गळ वनरक्षक पारेगाव पुनम साळवे, वनरक्षक वडाळीभोई यांच्या उपस्थितीत या सापास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

 अल्बीनो साप इतर सापांच्या रंगापेक्षा वेगळा असतो.इतर सापांना जसे रंग आहेत तसा हा साप रंगहीन असून तो पांढऱ्या रंगाचा असतो ,तसेच डोळे लाल रंगाचे असतात. माणसांना ज्या प्रमाणे कोड असते तसेच प्राण्यांच्या बाबतीत तोच प्रकार लागू होतो. यात सापही त्याला अपवाद नाही. 

जाणकार:-

१)अलबिनीझम हा रंगाचा अभाव असल्याने होतो,आणि हे गुणसूत्रांमध्ये बदल आल्याने होत असते.

त्यामुळेच असे अल्बीनो प्राणी जन्माला येत असतात. त्यांचा रंग नैसर्गिक नसल्याने ते निसर्गात जास्त दिवस जगू शकत नाहीत पण कांही साप अल्बीनो असूनही मोठे झालेले निदर्शनास आले आहे. डॉ वरद गिरी ,भारतीय सरीसृप व उभयचर तज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी उपसंचालक.

 

 

२) नागरीकांनी पांढऱ्या रंगांचा तसेच लाल डोळे असलेला अल्बीनो साप बघितल्यास त्या बद्दल गैरसमज न पसरवता तात्काळ सर्प रक्षक किंवा जवळील वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा ,तसेच इतर कुठलाही सर्प किंवा वन्यजीव दिसल्यास त्याला न मारता वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क करून वन्यजीव रक्षणात सहभागी व्हावे.डॉ. सुजित नेवसे ,सहाय्यक उपवनसंरक्षक नाशिक पुर्व

 

३) रंगाने जन्मतः अलबिनीझम (कोड) असलेल्या माणसांना जसे उन्हात गेल्यास त्रास होतो त्याच प्रमाणे अल्बीनो सापाला ही उन्हाचा त्रास होतो ,यामुळे अशा सापांना निसर्गात जगणे कठीण होत असते पण हा साप जवळपास दीड फूट लांबीपर्यंत वाढला हे विशेष .सुशांत रणशूर,वन्यजीव अभ्यासक, ओझर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *